Monday, 9 July 2012





मी तू पण गेले बुद्धाच्या वाटेवर 
शोधले मी मलाच नव्याने आज बुद्धाच्या वाटेवर

प्रज्ञा, शील,करुणा, शांती बुद्धाच्या वाटेवर 
काम, क्रोध,अहंकार गळून पडले बुद्धाच्या वाटेवर

दु:खाचे 'कारण' उमगले बुद्धाच्या वाटेवर
सत्य पाहण्याची सम्यक दृष्टि बुद्धाच्या वाटेवर

मन,चित्त झाले शुद्ध आज बुद्धाच्या वाटेवर
वैज्ञानीक दृष्टिकोण मिळाला मज बुद्धाच्या वाटेवर

सम्राट,अजातशत्रु आले बुद्धाच्या वाटेवर
रावणही झाला प्रबुद्ध या बुद्धाच्या वाटेवर

एक दिवस 'मनु'लाही यावे लागेल अखेर बुद्धाच्या वाटेवर
कारण अवघे जग आहे आज बुद्धाच्या वाटेवर !!

Tuesday, 3 July 2012

पावसावर बोलू काही !!


पावसावर बोलू काही !!

काल पाऊस निनादत आला
पांघरुनी गर्द हिरवा शेला
निसर्गही बहरुनी गेला

भिजते झाड, इमारत अन झोपडे
त्याला नसते तमा, तुम्ही सरळ की वाकडे
तो बरसतो शेतात,अंगणात, अन टेरेसवरही
तो बरसतो तसाच भारत,चीन,अन पाकवरही

त्याला नसतात कशाच्या सीमा
हा उच्च तो नीच,हा काळा तो गोरा
हा देशी तो विदेशी, हा घाटी तो बिहारी
हि असते आपल्या कौर्याची परिसीमा

बरे झाले 'देव' नाही
तो निसर्ग आहे
त्यावरही 'हक्क' सांगण्याची
बडव्यांची दृष्टि वक्र आहे
अरे गबाळ्यांनो यज्ञ-यागाने येईल तो कसा?
हे निसर्ग चक्र आहे.

-मिलिंदा (०३-०७-२०१२)
 —



Saturday, 30 June 2012














विठ्ठला... तू झाला हायजॅक  !!

आज सुरुवात कुठून करावी तेच कळत नव्हते
विषय फार संवेदनशील आणि तितकाच भावनीक आहे
आज आषाढि-एकादशी
तीकडे पंढरपुरात विठ्ठल भक्तांच्या भक्तिचा पुर आला असेल.
भाविक शेकडो मैलांचे अंतर पायी तुडवून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात
मात्र शेकडो मैल चालत आलेल्या वारकरी बांधवाना त्यांचा विठ्ठल भेटतो का ?
कशा स्वरुपात भेटतो? का नुसतेच क्षणिक समाधान?
त्याच्या भेटिच्या ओढिने येणारे लोक त्यास नवस बोलून साकडे घालू लागली आहेत
इतकेच काय महाराष्ट्रराज्याचा खुद्द मुख्यमंत्री जेव्हा तीथे 'शासकिय पुजा' करतो
आणि राज्याच्या विकासासाठी साकडे घालतो तेव्हा हे गांभिर्याने पहावे लागते.
ब्राह्मणी कर्मकांडात आज विठोबा गुरफटून गेला आहे.

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रेतयां होय मुक्ती ॥केशवासी नामदेव भावें ओंवाळीती
खरेच असे होते काय?  केवळ दर्शनाने पाप क्षालन, प्रायश्चित्त, मुक्ति वगैरे साध्य होते?

भागवत धर्माची पताका काश्मिर ते कन्याकुमारी नेणार्‍या नामदेवांनाही
असे कधी वाटले नसेल की ,खुद्द विठोबालाच कुणी हायजॅक करु शकेल.

भागवत धर्म आणि हिंदु धर्म हे मुळातच भिन्न दैवते ,प्रतिकं/ भिन्न अध्यात्मिक विचार
आणि विषमता व समानतेची भिन्न व्याख्या या पायायावर आधारलेले.
तरीही हिंदुत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहेत ते
भागवत धर्म हा हिंदु धर्माचीच एक शाखा आहे असे
जनसामान्यांच्या मनावर ठसविण्याच्या प्रयत्नात असतात.
इतकेच काय तथागत भगवान बुद्ध हा विष्णूचाच अवतार असल्याचे ठोकून देतात.
कालच स्टारमाझावर वा.ना. उत्पात यांनी असे बालिश वक्तव्ये करुन उत्पात  केला.
एव्हढ्यावरच न थांबता बुद्धधम्म हा ही  हिंदुधर्माचीच एक शाखा आहे  असे ते समजतात.

अख्यायीका-
विठ्ठल हा भक्त पुंडलीकाला दर्शन देण्यासाठी तो अवतीर्ण झाला
त्या वेळी पुंडलीक भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटात
आपल्या मातापित्यांची सेवा करीत होता.
ती अर्ध्यावर सोडून प्रत्यक्ष भगवंताला भेटायलासुद्धा तो तयार नव्हता.
पण आलेल्या पाहुण्याचे स्वागत तर केले पाहिजे.
त्या ठिकाणी त्याला बसण्यासाठी पाट किंवा सतरंजी तो कोठून आणणार?
 त्याने जवळच पडलेली एक वीट श्रीविष्णूच्या दिशेने भिरकावून दिली
आणि तिच्यावर थोडा वेळ उभे राहण्याची विनंती केली.
त्या विटेवर उभा राहून तो 'विठ्ठल' झाला तो कायमचाच.
अवतरणे’ म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक
अवतार’ ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम,
रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही.
विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा.
त्यामुळे विष्णूच्या दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही
तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो
त्यातही विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश नाही.
मग नेमके काय समजावे?
इथेहि स्वतःला हुशार समजणार्‍या तथाकथीत लोकांनी
आपल्या स्वार्थासाठी बनवाबनवी तर केली नसावी?

विठ्ठलाचे  दृश्यरूप हे  इतर कल्पित देवांहून भिन्न आहे.
तो "विटेवरी उभा, कटेवरी हात।" असा पूर्णतया मानवी आहे.
गणपती गजमुख,विष्णू चतुर्भुज, शंकर त्रिनेत्र, ब्रह्मा,दत्त त्रिमुखी, हे सगळे देव 'अमानवी' आहेत.
विठोबाला ताप येणे, त्यास वज्र लेपन करणे,
अभिषेक करणे हे सर्व कर्मकांड हिंदुंनी त्यात घुसखोरी केल्यामुळेच
अन्यथा मुळ वारकर्‍यांना आणि खुद्द विठोबालाही असले कर्मकांड अपेक्षित नसावे.
त्यामुळे पुर्वपार वारकरी आणि बडवे यांच्यात संघर्षहि होत आलेला आहे.
विवेक हा संतांचा स्थायीभाव असतो,
विवेकाच्या चार गोष्टी जगाला समजावून सांगणे हे संतांचे जीवनकार्य.
आता, सारासारविवेकाने वागणे हे सोपे नसते.
त्यासाठी मूळ स्वभावप्रवृत्तींना मुरड घालावी लागते.
हाच विरोधाभास संत आणि सामान्यजनांमध्ये पक्षी वारकर्‍यांमध्ये पहायला मिळतो
ज्ञानेश्वरांच्या पालखी-दिंडीत तुकारामांचे अभंग म्हणल्यामुळे पार मारामार्‍या झाल्या होत्या.
अर्थात भागवत धर्मावर हिंदु धर्माचे प्राबल्य असल्यामुळेही
अशा गोष्टि घडल्या असाव्यात असे म्हणता येऊ शकते.

समाजातच राहून, समाजाबरोबरच चालून-सवरून
मूल्यांकित जीवनशैलीचा आदर्श आपल्या जगण्याद्वारे समाजासमोर ठेवायचा,
ही संतांच्यासाठी अनिवार्य बाब आहे.
स्वतःला काहीही मिळवायचे नसले तरी
समाजाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी संतांना लोकसंग्रह आवश्यकच आहे,
हा भागवत धर्माच्या शिकवणुकीचा गाभा.
परंतू मुळ स्त्रोतच जर 'अवतारी' (चमत्कारी) असेल तर तो पुढिल काळात टिकणे कठिण आहे.
आणि त्यामुळे अनुयायी मग विवेक हरवुन परावलंबी होतात.
आपण या गोष्टि विचारात घेत नाही.
यातूनच मग अशा प्रतिकांचे,दैवतांचे बाजारीकरण होण्यास सुरुवात होते.
आणि मग "गावोगावी जी साई ची मंदिरे आहेत ती खोटि (duplicate) आहेत.
शिर्डि हेच साईचे मुळ मंदिर आणि वास्तव्य असे शिर्डि संस्थानाला जाहीर करावे लागते.
 उद्या विठ्ठलाला हिरेजडीत सोन्याच्या विटेवर उभे केले आणि तेथील बडव्यांनी
"आमचाच विठ्ठल खरा आहे,दुसरी मंदिरे नकली आहे येथेच या. "
असे जाहीर केले तर आश्चर्य वाटायला नको.

यात एक मुद्दा महत्वाचा वाटतो, संत निर्मितीची प्रक्रिया थांबली आहे असे कुठे तरी वाटत राहते
जे काही संतनिर्मित साहित्य आहे ते परंपरागत पुढे चालत आले आहे,
पण अलिकडच्या काळात त्यातही काही नवनिर्मिती झालेली नाही.
त्यामुळे विठोबा ब्राह्मणी जोखडातून मुक्त करायला हवा.
भागवत धर्माचा पाया हा
'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।
या तत्वावर आधारलेला असला तरी केवळ अशी भजने करुन / साहित्य निर्मिती करुन
समाज शहाणा होणे नाही , त्यास प्रत्यक्ष कृतीची गरज असावी लागते,
संत परंपरेने  चौकटित राहूनच त्यांचे कार्य केले,
विष्णु देवाने वर्ण व्यवस्था जन्माला घातली असे विष्णु पुराणात म्हणले आहे,
त्यामुळे मुळात चौकटच विषमतेने ग्रासलेली होती तीथे सामाजीक परिणाम काय साधणार?
भागवत धर्म टिकावयाचा असेल तर त्यांनी
कर्मकांड, ब्राह्मणी भेद-भावयुक्त संस्कार सोडून
विज्ञानाची कास धरावी तर तो येत्या काळात टिकू शकेल.


           

Wednesday, 27 June 2012


थोर महापुरुष हे कधिही कोणत्याही समाजाचे नसतात.
त्यांच्या कार्यामुळे ते या सर्वा पलिकडे गेलेले असतात.
मात्र त्यांच्याशी संबंधित असलेले समाजघटक
त्यांच्याशी एका भावनीक नात्याने जास्त घनीष्टपणे जुडलेले असतात
त्यामुळे त्यांच्यात एक नाते निर्माण झालेले असते जे नैसर्गीक आहे.
या बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही

मात्र कधी कधी त्याची गैरसोयही होते आणि मग आपण व्यक्तिकेंद्रित/व्यक्तिपुजक होतो
यातून फुले-शाहू-आंबेडकर,छ.शिवाजी महाराज,गाडगेबाबा ,संत ,
लेखक, कवी ,कलाकार ,प्रसिद्धव्यक्ति हे ही सुटलेले नाहीत.
काल राजर्षि शाहू महाराजांची जयंती निमित्त
बर्‍याच आंबेडकरी बांधवांनी  स्वतःचे प्रोफाइल पिक
चेन्ज करुन राजर्षि शाहू महाराजांचे फोटो लावले होते.
सर्व फेसबुक राजर्षि शाहू महाराजांचे फोटोनी सजून गेले होते.बरे वाटले.
काल दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे
पिपल्स एजुकेशन सोसायटि यांच्या विद्यमाने
छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली,
ज्यांची नाळ चळवळीशी जोडल्या गेली आहे
त्यांना महापुरुषांची जयंती साजरी करण्यास सांगावे लागत नाही.

त्या कार्यक्रमाचा एक साक्षिदार म्हणून मला इथे अभिमानाने हे सांगावेसे वाटते कि
आंबेडकरी समाज हा नेहमी खुल्यामनाने,स्वच्छ आणि प्रामाणिक भावनेने
कोणतीही अढि न बाळगता महापुरुषांचा आणि त्यांच्या विचारांचा आदर बाळगतो,
आणि ते कृतीतूनही दाखवून देतो.
याच कार्यक्रमात आगरी समाजाचे पुढारी,
वक्ते म्हणून आलेले आयु.राजाराम पाटिल हे उपस्थितांना संबोधित करताना
म्हणाले "गेल्या काही वर्षापासून मी चळवळीत आहे पण एका 'वेगळ्या' चळवळीत
ज्या चळवळीत माणसा माणसांत भेद केला जातो,
इतरांना तुच्छ लेखकले जाते,जीथे केवळ विषमता जोपासली जाते
तीथे माझी घुसमट होत होती त्या "हिंदुत्ववादि" चळवळीत मी काम करत होतो,
पण जेव्हा मला आंबेडकरी चळवळ, त्यांचे कार्य,समतावादि तत्व ,
सामाजीक सलोखा या गोष्टि समजल्या तेव्हा
मी कळून चुकलो की मी चुकिच्या मार्गावर आहे,
आणि आपसूकच मी या आंबेडकरी चळवळीशी जोडलो गेलो,
जी चळवळ केवळ माणूस हा केंद्रबिंदु माणून
त्याच्या सर्वांगीन विकास साधण्याच्या दृष्टिने प्रयत्नशील असते
त्या चळवळीतूनच पुढे कार्य करुन समाजाचा विकास साधणे हे ध्येय समोर ठेवले आहे."
या बोलक्या प्रतिपादनानंतर आणखी काय बोलणे शिल्लक राहते का?

 
या कार्यक्रमास माझ्या बरोबर माझे सहकारी आयु.गणेशजी चव्हाण,
अ‍ॅड.हरिशजी निरभवणे, अमोलजी गायकवाड, भुषण जाधव आदि उपस्थित होते.










Monday, 18 June 2012

एक अविस्मरणीय रविवार !!!

दिनांक -१७-०६-२०१२


सुशिक्षित आंबेडकरी तरुण आणि पर्यायाने आंबेडकरी समाज आज कुठेही कमी पडत नाही.
आज हे मला अभिमानाने सांगायचे आहे.
(सर्व शक्यता/ आणि अपवाद वगळून)
बाबा तुमच्या शिकलेल्या (लोकांनी )तरुणांनी तुम्हाला 'धोका' दिला नाही.
ज्ञानाचे क्षेत्र असो ,कि सामाजिक ,
सांस्कृतीक कलेचे असो कि अभिजात साहित्य क्षेत्र
आज आंबेडकरी समाजातील तरुण/तरूणी आपला वेगळा ठसा उमटवू पहात आहेत,
आणि त्यात यशस्विही  होत आहेत.
अर्थात त्याच बरोबर हा समाज केवळ राजकिय क्षेत्रात अपयशी होतो आहे
हे वास्तवही मी इथे प्रामाणिकपणे स्विकारतो.
अता गरज आहे ती फक्त सामाजिक दायित्व ओळखण्याची.
आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याची ,
आणि संघटितपणे प्रस्थापितांशी लढण्याची.

अता मुळ मुद्यावर येतो,
तर काल आमचे एक मित्र आयु. अमोलजी गायकवाड
यांचा वाढदिवस व संघटनेची रविवारची  मिटींग हे दोन्ही एकाच दिवशी (रविवारी) आले,
त्यामुळे टिम मध्ये कमालिचा उत्साह होता,
आधिच उल्हास त्यात श्रावणमास असे काहिसे वातावरण ;-)
नेहमी प्रमाणे परमपुज्य डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करुन सुरुवात झाली.
आज चैत्यभुमी समोरील समुद्रालाही उधाण आले होते,
पावसाचे बरसणे चालूच होते,
अशा प्रतिकुल परिस्थितीतही लोक अभिवादन करायला मोठ्या संख्येने चैत्यभुमिवर येत होते,
हे पाहून मनोमन सुखावलो आणि आपसुकच
बाबांनी केलेल्या उत्तुंग कार्यापुढे ओलावलेल्या कडांनी नतमस्तक झालो.

एक सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर
आयोजनानुसार आम्हि मग नियोजीत रक्तपेढि कडे मोर्चा वळविला.
तो कार्यक्रम आटोपून आम्हि पुन्हा चैत्यभुमीकडे परतलो
दोन- दोन प्रमाणे गट करुन भरपावसात धम्म प्रसार आणि प्रबोधनाचे कार्यसुरु झाले.
हल्ली लोक जागृत झाले आहेत, प्रबोधन,वाचन यामुळे
चैत्यभुमीला बौद्धेतर लोकांचीही गर्दि मोठ्या प्रमाणावर होते आहे,
त्यातूनच मग जवळच असलेल्या सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेऊन
चैत्यभुमिला भेट देणार्‍या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे,
या अनुशषंगाने बौद्ध समाजातील व्यक्तिंना नम्रपणे २२ प्रतिज्ञा
आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्व पटवून देण्याचा यशस्वि प्रयत्न केला,
यास लोकांचाहि चांगला प्रतिसाद मिळाला,
या वेळी २२ प्रतिज्ञा अभियानवाले आयु.अरविंदजी सोनटक्के यांचे कार्य
किती महत्वाचे आणि गरजेचे आहे याचा प्रत्यय आला.
त्यांना सप्रेम जयभीम !!
ग्रासलेवलवरील या कामाने प्रेरीत  होऊन
काही महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी तर संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्या सर्वांचे स्वागत आहे.
साधारण तीनच्या सुमारास सर्वाच्या पोटात कावळ्यांनी काव-काव सुरु केली ,
मग सर्वांनी मोर्चा हॉटेलकडे वळविला,

आणि इथेच रविवारच्या दुसर्‍या अंकाला सुरुवात झाली.
हॉटेल तसे उच्चभ्रूवस्तित आणि पॉश होते,
अमोलजींचा वाढदिवसही  इथेच साजरा करण्यात आला,
बाजूच्या टेबलवर काही मित्रमंडळी बसली होती.
आमच्या थट्टा-मस्करीयुक्त हास्यफवार्‍यांनी त्यांनाही कळले की
हे लोक वाढदिवस साजरा करत आहेत.
यातच त्यांच्यामध्ये चाललेल्या चर्चेत
छ.शिवाजी महाराज आणी जावळीचे मोरे यांचा उल्लेख आला,
त्यामुळे आमचे कान टवकारले गेले
"इतिहासात जावळीच्या मोरेंची चुकिची नोंद झाली आहे."
असे त्यांच्यामधिल एक व्यक्ति त्याच्या मित्रांना पटवून देत होता
तेव्हा जावळीच्या मोरेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असलेली व्यक्ति
हि मोरेंचे वंशज असल्याचे कळले
समीर मोरे,असे त्या व्यक्तिचे नाव,
शेवटि न रहावून मी त्यांच्या चर्चेत भाग घेतला,
म्हणले पाहुया आजच्या या सो-कॉल्ड तरुणपिढिला किती इतिहास माहित आहे
आणि त्या शिवाय जावळीच्या मोरेंचे साक्षात वंशजच इथे असल्यामुळे
आणखी काही गोष्टि जाणून घ्यायची तीव्र इच्छा वाढली होती.
म्हणून प्रथम माझि ओळख सांगितली त्यानीही स्वतःची ओळख सांगताना
सांगितले हा आयटि इंजीनीअर, हा वकिल ,हा डॉक्टर
असे बोलून त्याने त्याच्या सो-कॉल्ड  विचारसरणीला अधोरेखीत केले.
अर्थात आमच्यातही एमबीए केलेले ,इंजीनीअर्स, वकिल,उच्चशिक्षित होतेच
पण 'त्यांच्या' बोलण्यातला नैसर्गीक अभिनिवेश स्पष्ट जाणवत होता

छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक कसा झाला? आणि कुणी केला?
हा पहिला प्रश्न मी विचारला.
आणि माझा अपेक्षा भंग झाला ,
उच्चशिक्षित असलेल्या या लोकांना या बद्दल्ल फारशी माहितीच नव्हती.
एव्हाना आमच्या इतर सहकार्‍यांनीही त्यांच्या टेबलचा ताबा घेतला होता
केवळ फेसबुकवर लेख ,चर्चा, आणि वाद- विवाद न करता
प्रत्यक्ष बाहेर लोकांशी वैचारीक वाद- विवाद करणारे आणि संवाद साधणारे
'भीमके बच्चे' पाहून मला अतिशय आनंद झाला.
मी ,आयु.आतिष कसबे,आयु.अमोल गायकवाड,आयु. सुमीत चव्हाण, आयु.गणेश चव्हाण,
आयु.भुषण जाधव ,
यांनी बाबासाहेब, भारताचा इतिहास, रिप्ब्लिकन राजकारण,
आरक्षण, मायावती,नक्षलवाद,खैरलांजी ,शिवसेना, मनसे,
मराठी अस्मिता आणि त्याचे राजकारण , वेगळ्या राज्याची मागणी
यावर मांडलेले तर्कशुद्ध मुद्दे आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला दिलेले सडेतोड उत्तर उसका जवाब नही.
जावळीच्या मोरेंचे वंशज समीर मोरेंचे अक्षरशहा डोळे पांढरे व्हायची वेळ आली.
आणि प्रकरण मुद्यांवरुन गुद्यावर येता येता राहिले,
अर्थात
जावळीच्या मोरेंनीच परिस्थितीचा अंदाज घेतला
आणि चक्क जाहिर विचारले कि तुम्ही लोक आत्ता किती आहात?(संख्येत)
तेव्हा आम्ही सहा आहोत( ते सुद्धा सहाच होते) असे सांगितल्यावर
मोरेंनी चक्क माघार हेत म्हणले जाऊ द्या यार तुम्ही आम्हाला इथेच मातीत गाडाल,
(यावर दोन्ही बाजूंनी प्रचंड हशा ...)
अर्थात भीमाच्या लेकरांचा आवेशही असाच होता,
त्यावेळी कुणीही शत्रु असता तर तो धुळीस मिळाला असता एव्हढे खात्रीने सांगतो,
एव्हढ्या वर्षांचा दबलेला ज्वालामुखी,अन्याय,अत्याचार ,
परमपुज्य डॉ.बाबासाहेबांचा  वारंवार केला जाणारा अपमान
या सर्वाचा परिपाक त्या आवेषात दिसत होता,
तरीही सर्वांनीच कमालीचा संयम बाळगला होता हे विशेष,

यात दोन प्रतिक्रिया फार महत्वाच्या आणि विचित्र होत्या
समाजात चुकिच्या गोष्टि सत्य माणने,चुकिची माहिती,आणि समज
ज्या आजही असे दर्शवितात कि
सो-कॉल्ड समाजातील यंगजनरेशन
हे अजुनही जातीय अन्याय,अत्याचार, आरक्षण या बद्दल कमालीचे अनभिज्ञ आहे.
एक प्रतिक्रिया होती विवेक पंडित (ब्राह्मण)यांच्या मते पुर्वि जो समाज शिकला
त्यानी  त्यांच्या पद्धतीने सर्वांना  (अज्ञान,अंधरात) ठेवले,
यावर एकच उपाय आहे तुम्ही लोक शिका.या सर्व गोष्टिंना ब्राह्मणच जबाबदार आहेत,
मी स्वतः एक ब्राह्मण असून असे बोलतोय,
यावर ,घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना आणि
पावलोपावली केले जाणारे अन्याय, अत्याचार, गळचेपी,
आरक्षण बंद करण्यासाठी केलेली आंदोलने यातून मुलांनी कसे शिकायचे?
यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
दुसरी प्रतिक्रिया ओबिसी असलेल्या गणेश आंग्रे यांची
यांच्यामते बाबासाहेबांनी घटनेत केवळ १० दहा वर्षां साठीच आरक्षणाची तरतूद केली होती,
राजकारणी मात्र घाणेरड्या राजकारणांसाठी ते सतत वाढवत आहेत.
हे ऐकून तर हसावे की रडावे तेच कळेना..
हे शिकलेल्या उच्चशिक्षित लोकांचे असे विचार आणि समज असेल तर
मग अशिक्षित सामान्य लोकांचे काय?

सर्व मुद्दे यथोचीत खोडून,समजावून झाल्यानंतर अर्थातच ते सर्व लोक खजील झाले होते,
शेवटि आपण सर्व प्रथम भारतीय आहोत आणि नंतर जात- धर्म या सर्वांच्या सहमतीवर चर्चा
थांबविण्यात आली .एकूणच हा रविवार अविस्मरणीय असाच ठरला.

Thursday, 22 March 2012

बघ बाबासाहेबांची आठवण येते का?


कवि सौमित्र यांची माफि मागून
"बघ माझी आठवण येते का?"
या कवितेचा स्वैर अनुवाद करण्याचा छोटासा 'प्रयत्न' केला आहे,
अर्थात तो प्रयत्न किती जमला हे तुमच्या प्रतिसादांवरच अवलंबून आहे,
काही चुका झाल्यास क्षमा करा,

बाजूच्या झोपडपट्टिवर कोसळणारा मुसळधार पाऊस
आलिशान फ्लॅटच्या खिडकित उभं राहून पहा
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर घे चवदार तळ्याचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का ?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
बाजुच्या झोपडपट्टि मधे ये,ती गलिच्छ अन वेदनांनी गजबजलेली असेलच,
तीथेच जागेवर पाय रोवून उभा रहा, जमिन सरकेल पायाखालची,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

मग चालू लाग, मनुवादाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा वेदना थांबेपर्यत,
त्या थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
कपडे बदलू नकोस, डोळे पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता तुझ्याशी प्रेमाने वागणार्‍या सवर्णा मित्राची वाट बघ,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, तो सवर्ण असेल,
त्याच्या हातातली मिठाई घे,गिता ,देवांच्या आरत्यांची पुस्तके तो स्वतःच काढिल,
तो विचारेल तुला तुझ्या अस्वस्थपणाचे कारण,
तू म्हणं काही नाही, आज खर्‍या अर्थाने वास्तव जाणवले,
मग पत्निला चहा करायला सांग, तूही घे ,
तो उठून गायत्रीमंत्र लावेल, तू तो बंद कर,
वामन दादांच्या रचना लाव,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

मग 'तो' अस्वस्थ होईल,
तो तुला जवळ घेईल म्हणेल तूझा सर्वधर्म समभाव मला आवडतो,
हे काय खूळ लावलयस?
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो पुन्हा हिंदुत्ववादावर वळेल, त्याच्या आवेशपुर्ण शरीराकडे बघ,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

तो तुला हे सर्व आजच्या जगात कसे निरर्थक आहे, असे पटवून सांगण्याचा प्रयत्न करील
तो तेवढ्यापुरता मनुवादहि नाकारील, अत्याचार आता होत नाहित,
भेदभाव- जातियवाद संपुष्टात आलाय, आणि तरीही तू आंबेडकरवाद घेवून बसलायस?
असे म्हणून तो तुझी तुझ्या समाजापासून नाळ तोडायचा प्रयत्न करील,
तुमचे आरक्षण आता बंद झाले पाहीजे, गरजू ,होतकरु गरिबांनाच ते कसे योग्य यावरही भलेमोठे भाषण देईल.
तू त्याला प्रत्युत्तर करु नकोस शांतपणे ऐकून घे,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

तुझेच लोक कसे जातियवाद करतात, आरक्षणाने सर्वणावर अन्याय करतात हे ठासून सांगेल,
खोट्या अ‍ॅट्रासिटीजच्या केसेस, सवर्णांच्या मुलींना फुस लावून पळविणे
काम-धंदा न करणे, गलिच्छवस्तित राहणे यामुळे आरक्षणाचे फायदे असूनही तुम्ही लोक सुधारत नाही ,
तुम्हीच बाबासाहेबांना जातिपुरते बंदिस्त केले असा दावा करेल
तुमचे नेते संधी-साधु भिकारी असेहि हिणवेल
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

अस्पृश्यता मिटविण्यासाठी सावरकर, गांधीनी कसे 'थोरसमाजकार्य' केले
हे आवेशाने मांडून बाबासाहेबांच्या पंक्तित त्याना बसविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करेल
बौध्दधम्म हा हिंदुचाच एक पंथ आहे असे बोलून
तो तूला येत्या सत्यनारायणाच्या पुजेचे सपत्निक आमंत्रण देवून निघून जाईल,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
तुझ्या कॉम्प्लेक्सच्या शेजारी झोपडपट्टित राहणारे तुझे समाजबांधव आजही असे का जगत आहेत?
तु या अगोदर कोण होतास? कसा जगत होतास?
तुला कोणते अधिकार होते, कोणते नाकारले होते?
ते का आणि कुणी नाकारले होते या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न कर.
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

यानंतर मनुस्मृती व "बुध्द आणि त्याचा धम्म" हे पुस्तक वाचायला घे,
मित्राने केलेले ढोंगी बुध्दिभेदि भाषण आणि वेदना विसरुन झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?