Thursday, 22 March 2012

बघ बाबासाहेबांची आठवण येते का?


कवि सौमित्र यांची माफि मागून
"बघ माझी आठवण येते का?"
या कवितेचा स्वैर अनुवाद करण्याचा छोटासा 'प्रयत्न' केला आहे,
अर्थात तो प्रयत्न किती जमला हे तुमच्या प्रतिसादांवरच अवलंबून आहे,
काही चुका झाल्यास क्षमा करा,

बाजूच्या झोपडपट्टिवर कोसळणारा मुसळधार पाऊस
आलिशान फ्लॅटच्या खिडकित उभं राहून पहा
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर घे चवदार तळ्याचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का ?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
बाजुच्या झोपडपट्टि मधे ये,ती गलिच्छ अन वेदनांनी गजबजलेली असेलच,
तीथेच जागेवर पाय रोवून उभा रहा, जमिन सरकेल पायाखालची,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

मग चालू लाग, मनुवादाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा वेदना थांबेपर्यत,
त्या थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
कपडे बदलू नकोस, डोळे पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता तुझ्याशी प्रेमाने वागणार्‍या सवर्णा मित्राची वाट बघ,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, तो सवर्ण असेल,
त्याच्या हातातली मिठाई घे,गिता ,देवांच्या आरत्यांची पुस्तके तो स्वतःच काढिल,
तो विचारेल तुला तुझ्या अस्वस्थपणाचे कारण,
तू म्हणं काही नाही, आज खर्‍या अर्थाने वास्तव जाणवले,
मग पत्निला चहा करायला सांग, तूही घे ,
तो उठून गायत्रीमंत्र लावेल, तू तो बंद कर,
वामन दादांच्या रचना लाव,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

मग 'तो' अस्वस्थ होईल,
तो तुला जवळ घेईल म्हणेल तूझा सर्वधर्म समभाव मला आवडतो,
हे काय खूळ लावलयस?
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो पुन्हा हिंदुत्ववादावर वळेल, त्याच्या आवेशपुर्ण शरीराकडे बघ,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

तो तुला हे सर्व आजच्या जगात कसे निरर्थक आहे, असे पटवून सांगण्याचा प्रयत्न करील
तो तेवढ्यापुरता मनुवादहि नाकारील, अत्याचार आता होत नाहित,
भेदभाव- जातियवाद संपुष्टात आलाय, आणि तरीही तू आंबेडकरवाद घेवून बसलायस?
असे म्हणून तो तुझी तुझ्या समाजापासून नाळ तोडायचा प्रयत्न करील,
तुमचे आरक्षण आता बंद झाले पाहीजे, गरजू ,होतकरु गरिबांनाच ते कसे योग्य यावरही भलेमोठे भाषण देईल.
तू त्याला प्रत्युत्तर करु नकोस शांतपणे ऐकून घे,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

तुझेच लोक कसे जातियवाद करतात, आरक्षणाने सर्वणावर अन्याय करतात हे ठासून सांगेल,
खोट्या अ‍ॅट्रासिटीजच्या केसेस, सवर्णांच्या मुलींना फुस लावून पळविणे
काम-धंदा न करणे, गलिच्छवस्तित राहणे यामुळे आरक्षणाचे फायदे असूनही तुम्ही लोक सुधारत नाही ,
तुम्हीच बाबासाहेबांना जातिपुरते बंदिस्त केले असा दावा करेल
तुमचे नेते संधी-साधु भिकारी असेहि हिणवेल
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

अस्पृश्यता मिटविण्यासाठी सावरकर, गांधीनी कसे 'थोरसमाजकार्य' केले
हे आवेशाने मांडून बाबासाहेबांच्या पंक्तित त्याना बसविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करेल
बौध्दधम्म हा हिंदुचाच एक पंथ आहे असे बोलून
तो तूला येत्या सत्यनारायणाच्या पुजेचे सपत्निक आमंत्रण देवून निघून जाईल,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
तुझ्या कॉम्प्लेक्सच्या शेजारी झोपडपट्टित राहणारे तुझे समाजबांधव आजही असे का जगत आहेत?
तु या अगोदर कोण होतास? कसा जगत होतास?
तुला कोणते अधिकार होते, कोणते नाकारले होते?
ते का आणि कुणी नाकारले होते या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न कर.
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?

यानंतर मनुस्मृती व "बुध्द आणि त्याचा धम्म" हे पुस्तक वाचायला घे,
मित्राने केलेले ढोंगी बुध्दिभेदि भाषण आणि वेदना विसरुन झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ बाबासाहेबांची आठवण येते का?